कराड : बापाकडून कोयत्याने दोन चिमुकल्यांवर वार ; पत्नीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याच्या रागातून कृत्य | Two small children beaten by father amy 95

0
2पत्नीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याच्या रागातून संतापलेल्या निर्दयी इसमाने आपल्या पोटच्या पाच व सहा वर्षे वयाच्या दोन चिमुकल्यांवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना कराडलगतच्या गोटे गावामध्ये घडली.पोलिसांनी रामदास बाबासो वायदंडे (रा. गोटे, ता. कराड) यास अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे. तर श्लोक रामदास वायदंडे (वय ५) व शिवम रामदास वायदंडे (वय ६) अशी जखमी झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. यापैकी श्लोक गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रामदास वायदंडे हा आपली आई इंदूबाई, पत्नी मयुरी तसेच शिवम, श्लोक व ३ वर्षांची मुलगी बेला यांच्यासह गोटे गावी राहत आहे. दरम्यान, रामदास व मयुरी यांना एक महिन्यापूर्वी तिसरा मुलगा झाला. त्यानंतर मयुरीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली. त्यास रामदासचा विरोध होता. यावरून पती-पत्नीमध्ये वाद होता. याच रागातून रामदास हा मयुरीने शस्त्रक्रिया केलेले टाके कोयत्याने तोडण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणून इंदुबाईंनी मयुरीला तिच्या माहेरी पाठविले होते.

रामदास हा रविवारी (दि.१८) सायंकाळी मयुरीने कुटुंब नियोजनाची शास्त्रक्रिया का केली? व तिला माहेरी का पाठवले? म्हणून घरांमध्ये भांडण करीत होता. मुलांना मारहाण करीत होता. तसेच आई इंदुबाईसह आज कोणालाच सोडणार नाही, असे धमकावत होता. यावर इंदुबाई या शिवम व श्लोकला घेऊन घराबाहेर बसल्या होत्या. परंतु, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुले खेळत घरामध्ये गेली. त्यांच्या पाठीमागून इंदुबाईही घरामध्ये धावल्या. तेव्हा रामदासने शिवीगाळ करत आता तुम्हाला ठार मारून टाकतो, असे म्हणत शिवम व श्लोकवर कोयत्याने वार केले. यामध्ये श्लोकच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तसेच शिवमच्या डाव्या हाताच्या मनगटावर कोयत्याने वार झाल्याने तोही जखमी झाला. यावेळी इंदुबाईनी आरडाओरडा केल्याने शेजारील लोक जमा झाले. त्यांनी रामदासकडील कोयता हिसकावून घेत जखमी श्लोक व शुभमला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. या घटनेची खबर मिळताच कराड शहर पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी रामदास वायदंडेला अटक केली. याबाबतची फिर्याद दिलीप गुलाब तुपे (रा. मुंढे) यांनी पोलिसांत दिली आहे.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here