“काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती…”, गजानन किर्तीकरांनी दिला सल्ला; म्हणाले, “शिवसेनेने स्वतंत्र बाण्याने लढावे”

0
5मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्याने राज्यात सत्तापालट झालं. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी समर्थन दिलं. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर सुद्धा शिंदे गटात सामील होण्याची शक्यता होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर तसे संकेत मिळतं होते. मात्र, यावरती आता गजानन किर्तीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा गोरेगावमध्ये पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेने महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. या मेळाव्याला खासदार गजानन किर्तीकरही उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “निवडणुकीच्या पूर्वी गटमेळावा आयोजन करण्याची पद्धत आहे. या निवडणुकीत शिवसेनेपुढे आव्हाने आहेत. एका बाजूला शिंदे गटातील ४० आमदार, एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेलं मुख्यमंत्रीपद आणि त्यांनी केलेली भाजपाशी युती. दुसरीकडे महाविकास आघाडीसोबत अडीच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आलेला अनुभव आहे.”

“भाजपासोबत युती करायची नसेल तर…”

“महाविकास आघाडीत असताना शिवसेनेतील पुष्कळ आमदार नाराज झाले होते. राष्ट्रवादीने सत्ता उपभोगली, निधी लाटला, शिवसेनेकडे फक्त मुख्यमंत्रीपद होते. त्याचा फायदा शिवसेनेला झाला नाही. शिवसैनिकांच्या शब्दाला जिल्ह्यात किंमत नव्हती, त्यांच्यावर पोलीस केस करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी आहेत. यापुढे काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती नको. भाजपासोबत युती करायची नसेल तर, स्वतंत्र बाण्याने लढावे. सत्तेवर येण्यासाठी आणखी दहा वर्षे लागतील,” असेही गजानन किर्तीकर यांनी स्पष्ट केलं.

“मुख्यमंत्र्यांसोबत राजकीय चर्चा…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत किर्तीकर यांनी सांगितलं की, “माझे एकनाथ शिंदे यांच्याशी जुने संबंध आहेत. माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते भेटायला आले होते. तेव्हा कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. अशोक चव्हाण, नारायण राणे, मनोहर जोशी, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गणपती उत्सवासाठी वर्षावर गेलो होतो,” असे गजानन किर्तीकर यांनी म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here