विनायक राऊत १२ खासदारांसह शिंदे गटात यायला तयार होते, पण…”, नितेश राणेंचा मोठा दावा | Nitesh Rane big claim about Shivsena rebel and MP Vinayak Raut Uddhav Thackeray

0
4भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. “विनायक राऊत यांनाही १२ खासदारांसोबत शिंदे गटात यायचं होतं, पण भाजपा नेतृत्वाने त्यांना नाकरलं असेल,” असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. तसेच अनिल परब, विनायक राऊत, अनिल देसाई हे उद्धव ठाकरेंचे तरी आहेत का? असा सवाल केला. ते गुरुवारी (२२ सप्टेंबर) टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

नितेश राणे म्हणाले, “खासदार विनायक राऊत आणखी केवळ १२-१३ महिन्याचे खासदार आहेत. ते जास्त काळ खासदार राहिलेले नाहीत. त्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या बाता करू नये. मुळात ते नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने निवडून आले आहेत. त्यांची स्वतःच्या मतदारसंघात काडीची कामं नाहीत. त्यांनी मोठी भाषा वापरू नये. त्यांनी आपली खासदारकी वाचते की नाही याची चिंता करावी, मग आमची काळजी करावी.”

“परब, राऊत, देसाई हे उद्धव ठाकरेंचे तरी आहेत का?”

“अनिल परब, विनायक राऊत, अनिल देसाई हे उद्धव ठाकरेंचे तरी आहेत का? हे कधी कधी कसे कसे भाजपा नेत्यांना भेटतात हे आम्हाला माहिती आहे. सध्या एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या १२ खासदारांसोबत विनायक राऊतांनाही यायचं होतं. भाजपा नेतृत्वाने त्यांना नाकारलं असेल. हे एका पायावर तयार होते. कोठे किती बैठका झाल्या, कसे प्रयत्न करत होते याची माहिती देईल तेव्हा विनायक राऊतांची कुंडली बाहेर येईल,” असा थेट इशारा राणेंनी राऊतांना दिला.

“ठाकरेंसोबत असलेल्या खासदारांचे आजही फोन येतात”

नितेश राणे पुढे म्हणाले, “मला शिंदे गटात घ्या म्हणून कोणाकोणाला फोन जात होते, कोणाला विनंती केल्या हे समोर आल्यावर मग ठाकरेंची निष्ठा कळेल. आत्ता उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या खासदारांचे आजही फोन येतात. आम्हाला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत घ्या असं ते म्हणतात. त्यांचे कधी कधी कोणाला फोन येतात याची माहिती कधी तरी महाराष्ट्राला द्यावी लागेल.”

हेही वाचा : “नितेश राणे स्वतःच्या बापाचं ऐकत नाहीत,” किशोरी पेडणेकर संतापल्या; म्हणाले “ते काय रात्री…”

“विनायक राऊत कधीही शिंदे गटात जाणारा खासदार”

“विनायक राऊत कधीही शिंदे गटात जाणारा खासदार आहे. ते एका पायावर तयार आहेत. कोणाच्या माध्यमातून बोलणी होते आहे हेही मी सांगू शकतो, फक्त योग्य वेळ येऊ द्या. त्यामुळे त्यांनी जास्त बडबड करू नये. राऊत ठाकरेंचीही नाहीत हे ठाकरेंनी लक्षात ठेवावं,” असा इशारा नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here