bjp mission baramati cabinet minister nirmala sitharaman visit sharad pawar ncp

0
2हृषिकेश देशपांडे

गेल्या आठ ते दहा वर्षांत भारतीय जनता पक्ष अनेक निवडणुकांमध्ये यशस्वी ठरताना दिसतो. गावपातळीपर्यंत पक्षबांधणी, त्याला समविचारी संघटनांची जोड तसेच कल्याणकारी योजनांचा तळागाळापर्यंत प्रसार व प्रचार अशी अनेक कारणे यामागे आहेत. आताही आगामी लोकसभा निवडणूक २०२४च्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद कमकुवत असलेल्या देशभरातील १४४ तर राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांवर या मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेला पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २२ सप्टेंपासून तीन दिवस या मतदारसंघात आहेत. या मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. याअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांत २१ कार्यक्रम होणार आहेत. ‘आम्ही अमेठी जिंकली आता बारामतीतही यश मिळवू’ अशी घोषणा भाजपने केली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी २०१९मध्ये राहुल गांधी यांचा पराभव केला होता. मात्र बारामती आणि अमेठीतील स्थिती वेगळी आहे.

शरद पवार यांचा प्रभाव

बारामतीमध्ये १९७१पर्यंत काँग्रेस तर १९७७च्या जनता लाटेत संभाजीराव काकडे विजयी झाले. गेल्या ४५ वर्षांत शरद पवार यांच्या कुटुंबातील किंवा पवार यांनी दिलेला उमेदवार विजयी झाला आहे. गेल्या तीन निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे येथून निवडून आल्या आहेत. २०१४मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर जवळपास ७० हजार मतांनी पराभूत झाले. त्या वेळी जानकर यांनी कमळ चिन्ह घेतले असते तर सुप्रियांचे मताधिक्य आणखी कमी झाले असते असे विश्लेषक सांगतात. अर्थात हा अपवाद वगळता विरोधकांना या मतदारसंघात फारसे आव्हान उभे करता आलेले नाही. त्यामुळे २०२४मध्ये बारामती जिंकण्यासाठी भाजपने आतापासूनच प्रयत्न चालवले आहेत.

विश्लेषण : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर का कारवाई?

बारामती मतदारसंघाचे स्वरूप काय?

एकूण सहा विधानसभा मतदारसंघ यामध्ये आहेत. यात बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर, दौंड आणि खडकवासला यांचा समावेश आहेत. त्यात बारामतीमध्ये अजित पवार तर इंदापूरमध्ये दत्ता भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. भोर व पुरंदरमध्ये अनुक्रमे संग्राम थोपटे व संजय जगताप हे काँग्रेसचे आहेत, तर दौंडमध्ये भाजपचे राहुल कुल तर खडकवासल्यात भीमराव तापकीर प्रतिनिधित्व करतात. संघटनात्मकदृष्ट्या या सहाही मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगली आहे. खडकवासला व दौंड येथे गेल्या म्हणजेच १९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आघाडी मिळवली होती. पुरंदर, भोरमध्ये भाजपचा फारसा संघटनात्मक विस्तार नाही.

पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे आता शिंदे गटात आहेत, तर भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा झाली होती. विकासकामांसाठी ही भेट होती असा खुलासा थोपटे यांनी केला होता. त्यामुळे या दोन मतदारसंघांवर भाजपचे विशेष लक्ष आहे. भोरचा काही भाग पुणे शहराला जोडलेला आहे. इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आता भाजपमध्ये आहेत. येथे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा जुना सामना आहे. खडकवासला हा शहरी मतदारसंघ आहे. भाजपसाठी चिंता बारामती विधानसभा मतदारसंघाची आहे.

संस्थात्मक कामाची व्याप्ती…

बारामती शहरात उद्योग, शिक्षण, सहकार क्षेत्रातील नामांकित अशा संस्थांची उभारणी करण्यात शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. फेब्रुवारी २०१५मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीला भेट देऊन पवार यांचे कौतुक केले होते. पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्राला त्यांनी दिलेली पहिली भेट तीच होती हे विशेष. त्याच वर्षी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही बारामतीचा दौरा केला होता. आता निर्मला सीतारामन या भेटीवर आल्या आहेत.

विश्लेषण : स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणारे जम्मू-काश्मीरमधील नागरिक नेमके आहेत तरी कोण?

बारामतीमध्ये भाजपची रणनीती काय असेल?

बारामतीमध्ये पवार कुटुंबाला शह देणे कठीण आहे. संस्थात्मक कामामुळे लोक जोडले आहेत. मात्र या भागातील शहरीकरणाची गती पाहता मतदार मोदींकडे आकृष्ट होईल असा भाजपचा होरा आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीकडे या मतदारसंघाची जबाबदारी आहे. पुढील १८ महिन्यांत किमान पाच ते सहा वेळा या मतदारसंघात भेटीचे सीतारामन यांचे नियोजन असल्याचे भाजपकडून सांगण्यात येते. वातावरणनिर्मिती करून तसेच संघटनात्मक ताकदीच्या जोरावर आगामी निवडणुकीत पवार कुटुंबाला बारामती मतदारसंघातच अडकून ठेवण्याची भाजपची खेळी आहे. त्या दृष्टीनेच केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या बारामती मोहिमेची चर्चा आहे.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here