narayan rane, कोण उद्धवजी? कोण उद्धव ठाकरे? उद्धवss… नारायण राणेंची पत्रकाराशी हुज्जत, नेमकं काय घडलं? बघा… – narayan rane press conference over shivsena uddhav thackeray goregaon nesco maidan rally

0
6


मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गोरेगावच्या सभेची चिरफाड करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आक्रमक अंदाजात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संपूर्ण पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका केली. उद्धव ठाकरेंवर प्रहार करताना त्यांना महाराष्ट्रात फिरु न देण्याची धमकीही दिली. यावेळी ‘उद्धवजी ठाकरे’ म्हणत पत्रकाराने राणेंना प्रश्न विचारला. तर कोण उद्धवजी…? कोण उद्धव ठाकरे…? उद्धवss… असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना सन्मान देण्यास किंवा आदराने नाव घेण्यास विरोध दर्शवला.

मुंबईचे लचके तोडण्यासाठी काही गिधाडं मुंबईवर घिरट्या घालत आहेत. पण मुंबईचा आणि कमळाबाईचा संबंध काय? असा थेट सवाल करत हिंदू मुस्लिम भेद करुन दाखवा, मुस्लिम शिवसेनेसोबत आहे, मराठी-अमराठी भेद करा, अमराठी बांधव आमच्यासोबत आहेत, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी काल गोरेगावच्या नेस्को मैदानावरुन भाजपला ललकारलं. तसेच गटप्रमुखांच्या मेळाव्यातूनच दसरा मेळाव्याआधीचा ‘ट्रेलर’ दाखवून मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंगही फुंकलं. उद्धव ठाकरे यांच्या याच भाषणाची चिरफाड करण्यासाठी नारायण राणे यांनी मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे चांगलेच आक्रमक झाले होते.

नारायण राणे पत्रकाराला काय म्हणाले?

जवळपास अर्धा तास चाललेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. अगदी पहिल्या मिनिटापासून पत्रकार परिषदेच्या शेवटच्या मिनिटापर्यंत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका केली पण ही टीका करताना त्यांनी पातळी सोडली होती. उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंब संपल्यात जमा आहे, जे संपलेत त्यांना काय संपवणार? असं सांगत राऊतांनंतर जेलमध्ये जाण्याचा त्यांचा नंबर आहे, असं राणे म्हणाले. राणेंच्या निवेदनानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. एका पत्रकाराने ‘उद्धवजी’ असं म्हणताच.. कोण उद्धवजी… कोण उद्धव ठाकरे? उद्धव.ss…., असं राणे म्हणाले. त्यावर तुम्ही बोलू शकतात, आम्ही नाही… असं पत्रकार म्हणताच नाय नाय.. उद्धव बोललात तुम्ही, असं हसत हसत राणे म्हणाले.

उद्धव म्हणं, मुर्ख माणूस आहे तो; पत्रकार परिषदेत नारायण राणेंची आगपाखड

आमच्याकडे बघितलं तरी डोळे काढू, राणेंची धमकी

उद्धव ठाकरे यांनी काल नैराश्यातून भाषण केलं. उद्धव ठाकरे यांचं शिवसेना वाढीसाठी योगदान काय? निष्ठावंतांच्या रक्तावर शिवसेना वाढली. उद्धव ठाकरे केवळ आयत्या बिळावर नागोबा आहेत. उद्धव ठाकरेंनी किती मराठी माणसांना घरं दिली, नोकऱ्या दिल्या? उद्धव ठाकरेंनी जास्त बोलू नये. त्यांना तोंड बंद करु. संजय राऊत यांच्यासारखं उद्धव ठाकरेही जेलमध्ये जातील. आमचा कोथळा काढण्याची भाषा करताय, आमच्याकडे बघितले तरी आम्ही डोळे काढू, अशी धमकीच नारायण राणेंनी ठाकरेंना दिली.

मोदींसमोर उद्धव नखाएवढाही नाही, अख्ख्या पत्रकार परिषदेत ठाकरेंना अरेतुरे, राणेंनी पातळी सोडली
उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी काय केलं?

राणे म्हणाले, अमित शाह मुंबईत आले तर मुंबईवर चालून आले म्हणता. मुंबई काय तुमची आहे का? मुंबईवर संकट येते तेव्हा केंद्र सरकार नेहमी महाराष्ट्राला मदत करते. अशी एकही नैसर्गिक आपत्ती नाही ज्या आपत्तीला केंद्राहून मदत येत नाही. उद्धव ठाकरे तुम्ही मातृभूमीसाठी काय केलं? मुंबईकरांसाठी काय केलं? मला भाजपात घेऊ नये म्हणून तुम्ही अमित शाह यांना फोन केले तेच अमित शाह मुंबईत आले तर त्यांना गिधाडं म्हणता.. चांगलं बोलता येत नाही काय?, अशा शब्दात अमित शाह यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना राणेंनी उत्तर दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here