On This Day In History 19 September In History Know What Happened Today In History Narayan Guru Mahatma Gandhi

0
4


मुंबई: आजच्या दिवशी, 20 सप्टेंबर रोजी जगभरात आणि देशात अशा काही महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या, ज्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जग हे पृथ्वीकेंद्री नसून सूर्यकेंद्री आहे असा शोध लावणाऱ्या गॅलिलिओविरोधात आजच्याच दिवशी धर्मविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत खटला दाखल केला होता. तसेच भारतीय जातीव्यवस्थेविरोधात लढणाऱ्या नारायण गुरू यांचे आजच्याच दिवशी निधन झालं होतं.  जाणून घेऊया आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं होतं. 

1633- पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं सांगणाऱ्या गॅलिलिओवर खटला

अंतराळातील जग हे सूर्याच्या भोवती केंद्रीत झाले असून पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते असं सर्वात प्रथम सांगणाऱ्या गॅलिलिओवर इटलीतील चर्चने खटला भरला. अंतराळात पृथ्वी ही केंद्रबिंदू असून सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो असा समज त्याकाळी होता. त्यावर गॅलिलिओने अभ्यास करून या मताला छेद दिला आणि सूर्यकेंद्री सिद्धांत मांडला. 1610 मध्ये गॅलिलिओने ‘ द स्टारी मेसेंजर’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. शुक्राला कला कशा काय असतात? गुरूभोवती छोटे गोल फिरू शकतात? मग सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह का फिरू शकणार नाहीत? असे प्रश्न त्यामध्ये उपस्थित केले होते. त्याविरोधात चर्चने गॅलिलिओवर खटला भरला. नंतरच्या काळात गॅलिलिओचा हा सिद्धांत खरा असल्याचं सिद्ध झालं. 

1831- ब्रिटनमध्ये वाफेवर चालणारी पहिली बस सुरू 

ब्रिटनच्या गोल्डन ब्रॉन्झ यांनी वाफेवर चालणारी पहिली बस निर्माण केली होती. धिम्या गतीने जाणाऱ्या या बसमध्ये एकाच वेळी 30 प्रवासी प्रवास करु शकत होते. 

1856- थोर समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन

भारतातील जातीय भेदाविरोधात लढा देणारे थोर समाजसुधारक नारायण गुरु यांचं आजच्या दिवशी, 1856 साली निधन झालं होतं. नारायण गुरु यांचा जन्म केरळमधील तिरुअनंतपूरम या ठिकाणी झाला. त्यांना वेद आणि उपनिषिदे यांचं ज्ञान होतं. ‘एक जाति, एक धर्म, एक ईश्वर’ असा नारा देत त्यांनी जातीय भेदाविरोधात आवाज उठवला. नारायण गुरू यांनी ‘श्री नारायण धर्म परिपालन योगम्’ही संस्था स्थापन केली. अस्पृश्यांच्या सामाजिक, आर्थिक गरजांकडे लक्ष पुरविणे, त्याचप्रमाणे त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश होता. संस्थेतर्फे अनेक माध्यमिक व उच्च विद्यालये स्थापन करण्यात आली आणि गरजू व हुशार अस्पृश्य विद्यार्थांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यात आली. 

नारायण गुरु यांनी अस्पृशांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी वायकोम सत्याग्रह सुरू केला. त्यांचं निधन 20 सप्टेंबर 1856 रोजी झालं. केरळमध्ये त्यांची पुण्यतीथी ही श्री नारायण गुरु समाधी दिन (Sree Narayana Guru Samadhi) म्हणून पाळला जातो. 

1857- ब्रिटिशांनी दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली

ब्रिटिशांविरोधात 1857 साली पहिल्यांदा उठाव झाल्यानंतर उठाव करणाऱ्या क्रांतिकारकांनी दिल्ली ताब्यात घेतली होती. नंतरच्या काळात, 20 सप्टेंबर 1857 रोजी ब्रिटिशांनी पुन्हा एकदा दिल्ली ताब्यात घेतली आणि उठाव मोडून काढला. 

1878- द हिंदू वृत्तपत्राचे पहिले प्रकाशन

भारतातील नामांकित वृत्तपत्र असलेल्या द हिंदू या वृत्तपत्राला 20 सप्टेंबर 1978 रोजी सुरुवात झाली. सुरुवातीला साप्ताहिक असलेल्या या वृत्तपत्राचे नंतर दैनिकामध्ये रुपांतर झालं. द हिंदूने आजवर देशातील अनेक महत्त्वाच्या घटनांना वाचा फोडली आहे. 

1932- ब्रिटिशांच्या जातीय निवाड्याविरोधात गांधीजींचे आमरण उपोषण सुरू

16 ऑगस्ट 1932 रोजी इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी भारतीय दलित समाजासाठी विभक्त मतदारसंघांची तरतूद असणाऱ्या जातीय निवाड्याची घोषणा केली. तिसऱ्या गोलमेज परिषेदेमध्ये जातवार प्रतिनिधित्वावर एकमत न झाल्यामुळे त्यांनी हा जातीय निवाडा घोषित केला. 

या निवाड्यामुळे भारतातील सात कोटी लोकसंख्या असणारा दलित समाज हिंदू समाजापासून विभक्त होण्याचा धोका होता. 
म्हणून याला विरोध करत महात्मा गांधी यांनी पुण्यातील येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं. त्यांच्या या उपोषणाला यश आलं आणि 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार करण्यात आला. हा करार गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. या करारानुसार दलितांना विभक्त मतदारसंघाऐवजी 148 राखीव मतदारसंघ देण्यात आले. 

1946- फ्रान्समध्ये पहिल्या कान्स फिल्म फेस्टिवलची सुरुवात 

आजपासून 75 वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये पहिल्या कान्स फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. फ्रान्समधील रिसॉर्ट शहरात या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. या पहिल्या फिल्म फेस्टिवलमध्ये जगभरातील 21 चित्रपट दाखवण्यात आले होते. कान्स फिल्म फेस्टिवल हा जगातील एक प्रतिष्ठेचा फिल्म फेस्टिवल समजला जातो. दरवर्षी होणाऱ्या या फेस्टिवलमध्ये जगभरातील काही निवडक चित्रपट, डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म दाखवण्यात येतात. 

1996-  मराठी साहित्यिक दया पवार यांचे निधन

दया पवार हे मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ओळखले जातात. जातिव्यवस्थेविरोधात, अस्पृश्यांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात त्यांनी आपल्या लिखानातून आवाज उठवला. ‘बलुतं’ हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक साहित्यविश्वात विशेष गाजलं. त्यांच्या या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले. दलितांवर वर्षानुवर्षे होत असलेला अन्याय , त्यांचे शोषण आणि त्यांची मानसिक घुसमट यांना दया पवारांनी आपल्या साहित्यातून वाचा फोडली.  दया पवार यांचा कोंडवाडा हा काव्यसंग्रह आणि चावडी हा लेखसंग्रह विशेष प्रसिद्ध आहे. 

2001 अमेरिकेने दहशतवादाविरोधात युद्ध पुकारलं

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग हादरून गेलं. त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी 20 सप्टेंबर 2001 साली जागतिक दहशतवादाविरोधात युद्ध पुकारलं असल्याचं जाहीर केलं. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here